पिंपरी: पिंपरी: चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरातून एका महिलेचे तीन जणांनी स्कार्पिओमधून येत अपहरण केले आहे. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील काळभोर नगर येथून मध्यरात्री एकच्या सुमारास चालत जात असलेल्या महिलेला तिघांनी जबरदस्तीने उचलून स्कार्पियो गाडीमधून अपहरण केले आहे. सीसीटीव्हीमध्ये महिला प्रतिकार करताना दिसते, तिने आरडाओरडा देखील केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कौटुंबिक वादातून सदर महिलेचे अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे.
तसेच सदर महिलेच्या अपहरणाचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ अपहरण होण्यापूर्वीची असल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे. ज्या स्कॉर्पिओ गाडीतून महिलेचे अपहरण झाले, त्याच स्कॉर्पिओ गाडीमधून ती रस्त्याच्या मधोमध उतरल्याचे देखील दिसून येत आहे. नंतर हा पुढील प्रकार घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळेच या घटनेची कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने 112 नंबर वर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र संबंधित स्कॉर्पिओ गाडी आणि ती महिला ही अद्याप सापडलेली नाही. त्यानंतर पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून स्कॉर्पिओ गाडी आणि महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.