पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने पुण्यासह राज्यभरातील वातावरण तापलं होतं. या प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानुसार गाडे याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात शिवशाही बस मध्ये २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे याने बलात्कार केला होता. सकाळी सहाच्या सुमारास पीडित तरुणी गावी निघाली होती. गाडेने तिच्याकडे वाहक असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर गाडेने शिवशाही बसमध्ये तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार करुन पसार झालेल्या गाडेला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून तीन दिवसांनी अटक केली होती. त्यानंतर गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. बुधवारी गाडे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपली त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी पूर्वी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर न्यायालयाने आरोपी गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान नराधम आरोपी गाडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी युक्तीवादात केली होती.मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीस विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गाडे याला 14 दिवस( 26 मार्चपर्यत )न्यायालनीत कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या या आदेशानुसार गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.