Sassoon Hospital : पुणे : ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय चांगलेच चर्चेत आले असतानाच आता रुग्णालयाच्या लिफ्टमुळे पुन्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पुणे मनपाच्या अग्निशमन दलाकडून सहा जणांची सुटका करण्यात आली; परंतु सहा पैकी चार जणांची प्रकृती बिघडली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकल्याची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या ५ पुरुष आणि एका महिलेची सुटका केली. लिफ्टमध्ये अडकलेल्यांना रेस्क्यू करण्यासाठी लिफ्ट कापून काढावी लागली. सुमारे तासभर सहा जण लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लिफ्टमध्ये अडकलेले सहापैकी ४ जण ससून रुग्णालयाचे कर्मचारी असून, दोघे उपचारासाठी आलेले नागरिक होते. या सहा पैकी चार जणांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ऑक्सिजन लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
लिफ्टची नियमित तपासणी झाली नव्हती का? अनर्थ घडल्यास कोणाची जबाबदारी? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.