साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विजेच्या तारा (केबल), विद्युत रोहित्र, कृषी पंप तसेच घरफोडी व चोरीचे सत्र सुरूच आहे. नुकतेच सविंदणे, कवठे येमाई येथे विद्युत रोहित्र चोरी, आमदाबाद येथे घरफोडी झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी केबल तसेच कृषी पंप चोरांवर कारवाई केली होती. त्यावेळी काही गुन्ह्यांची उकल झाली. मात्र, इतर चोऱ्यांच्या तपासाबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात घोड आणि कुकडी नदीवरून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या भागात ८५ टक्के शेती बागायती झाली आहे. (Shirur News) या भागात टाकळी हाजी, आमदाबाद, वडनेर, कवठे येमाई, निमगाव दुडे, चांडोह, पिंपरखेड, जांबूत, काठापूर, म्हसे, माळवाडी, शरदवाडी, फाकटे तसेच सविंदणे, रावडेवाडी, मलठण या गावांतील कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी शिरूर पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्यांचा तपास लावण्यात शिरूर पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
शिरूरच्या बेट भागात चोरट्यांनी फोडलेली कृषी साहित्य, खते-औषधांची दुकाने, किराणा दुकाने तसेच घरफोड्या या घटनांचा तपास आजतागायत लागलेला नाही. (Shirur News) यामध्ये टाकळी हाजीतील दोन निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातील घरफोडीचाही समावेश आहे.
मंदिरातील चोऱ्यांबाबत यापूर्वीच्या काही घटनांतील आरोपींचा शोध लागलेला नसताना, नुकतेच आमदाबाद येथील मंदिरात चोरी झाल्याने या चोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेले शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सुरुवातीच्या काळात गावोगावी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत एक दबंग अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती.(Shirur News) त्या दरम्यान अवैध धंदे तसेच चोऱ्यांचे प्रकार थांबले होते. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनीही काही कारवाया केल्या होत्या. मात्र चोरट्यांमध्ये खाकीची दहशत राहिली नाही, अशी चर्चा होत आहे.
ग्रामसुरक्षा दल सक्रिय
अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाकाबंदी तसेच रात्रीच्या वेळी गस्तीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामसुरक्षा दले सक्रिय करण्यात येत आहेत, असे शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूरमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक, धार्मिक सलोखा