पुणे ता. १२ : नवी दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची (Eknath Shinde and Sharad Pawar) भाषणे चर्चेत असून त्यातही एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकारणात विविध अर्थ काढले जात असून आपल्या भाषणात शिंदे यांनी पवार यांच्यावर भरभरून स्तुती सुमने उधळली आहेत. त्यामुळे भविष्यात राजकारणाची दिशा बदलणार का? या बाबत चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?
ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला ते खा. शरद पवार हे देशाचे प्रसिद्ध फिरकी गोलंदाज सदाशिव शिंदे यांचे जावई आहेत. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळायची नाही आणि ते कधी क्लिनबोल्ड होत असत ते कळाचये नाहीत. पवारसाहेबांचीही राजकारणातील गुगली भल्याभल्यांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्यांची किंवा बसवलेल्यांची गुगली कधी पडेल हे सांगता येत नाही.
मात्र माझे आणि पवार साहेबांचे अगदी चांगले संबंध आहेत. त्यांनी आजवर कधी मला गुगली टाकली नाही आणि टाकणारही नाही असा विश्वास आहे, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं कसं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकावं असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आमचे मधूनमधून फोन सुरू असतात आणि मी पवार साहेबांचे मार्गदर्शन घेत असतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो, असेही ते म्हणाले
दरम्यान नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. श्री. शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे श्री. शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.
महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
या पुरस्कार सोहळ्यातील वक्तव्यांनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ही भविष्यात बदलणाऱ्या राजकीय घडामोडींची नांदी तर नव्हे अशा चर्चाही आता राजकीय वर्तुळात झडू लागल्या आहेत.