पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.या सभागृहात विरोधक मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेऊ शकतात. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाने सभागृहाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना आणि लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत. पुढे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार असून त्यानंतर विविध विधेयके मांडली जातील. यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ मांडले जाणार आहे. यात सकाळी प्रश्नोत्तर तासाच्या दरम्यान विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करू शकतात. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण होऊन सभागृहाचे कामकाज स्थगित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही सभागृह विविध मुद्द्यावरून गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांच्या आंदोलनापेक्षा सत्ताधारी आणि विरोधकांच्या गाठीभेटीमुळे अधिक चर्चेत आला. मात्र त्यानंतर विविध मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. दरम्यान काल अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी 6486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडल्या. त्यावर सहा आणि सात मार्च या दोन दिवशी चर्चा होऊन मंजूर केल्या जाणार आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. यावर सरकारची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.