पुणे : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता पुण्यातून कपडे विक्री व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी समीर मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील कपडे विक्री व्यवसायात गुंतवणूक करणारे मोहित मुकुंद गुनवरे (वय ३१, रा. सदाशिव पेठ) आणि आरोपी मोरे यांची मित्रामार्फत ओळख झाली होती. या ओळखीत त्याने कपडे निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय असल्याचं सांगितलं आणि या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष आरोपी मोरे यांनी त्यांना दिलं.त्यानंतर त्यांनी मोरे याला वेळोवेळी ११ लाख रुपये गुंतविण्यास दिले. मात्र त्याचा परतावा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर वारंवार आरोपी टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली . याप्रकरणी समीर मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर करत आहेत