पुणे : स्वारगेट बस स्थानकावर एका शिवशाही बस मध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने पुणे शहर हादरलं. ही घटना ताजी असतानाच पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली. अवघ्या 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या 28 दिवसापासून बेपत्ता असून तिचा अद्याप काही शोध लागलेला नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी 28 दिवस होऊन गेले तरी पोलिसांना मुलीचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, 7 फेब्रुवारी रोजी कोमल भोसले आपल्या कामावर गेल्या असताना त्यांच्या नवऱ्यासोबत त्यांचीं तीनही मुले घरी होती. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मुलाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की बहीण घरातून निघून गेली असून अद्याप परत आलेले नाही. घाबरलेल्या मनस्थितीत आईने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन त्याची तक्रार नोंदवली. या घटनेतील प्राथमिक तपासात एका अज्ञात तरुणाने मुलीला फुस लावून पळवुन नेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 28 दिवस उलटून ही पोलिसांना तिचा ठावठिकाणा लावण्यात यश आले नाही त्यामुळे कुटुंबाची चिंता आणखीनच वाढत चालली आहे.
दरम्यान या घटनेतील अल्पवयीन मुलगी शाळेत नवव्या इयत्तेत शिकत असल्याने तिचे शैक्षणिक नुकसान ही होत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने शोध मोहीम राबवून मुलीला परत आणावे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.