रांजणगाव गणपती: रांजणगाव एमआयडीसी, ता.शिरुर येथील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले व सन 2022 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी या पदावर काम केलेल्या महादेव वाघमोडे यांना नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर, डॉ. श्रीकर परदेशी, पोलिस महासंचालक डॉ.रश्मी शुक्ला, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते.
या पुरस्काराबाबत पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले की, “शिवाजीनगर पोलीस ठाण्याची कोल्हापूर परिक्षेत्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील एक संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळख आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (सध्या अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर) यांनी 2021 मध्ये प्रभारी अधिकारी म्हणून माझी नेमणूक केली. पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करणे, पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, सचोटीने व वेगाने तपास करणे, केसेसचा न्यायालयात प्रभावी पाठपुरावा करणे, आरोपींवरती प्रतिबंधात्मक कारवाई, त्याचप्रमाणे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचे संरक्षण करण्यात पोलीस ठाणे प्रभावी ठरले”.
धार्मिक तसेच जातीय सलोखा ठेवण्यात पोलीस ठाणे जनतेच्या विश्वासास पात्र ठरले. सदरच्या कामकाजाची दखल घेऊन कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस ठाण्याच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पोलीस महासंचालक कार्यालयास प्रस्ताव सादर केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा बहुमान मिळाला. पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचा हा सन्मान असून इचलकरंजी नागरिकांचे सहकार्य देखील लाभल्याचे वाघमोडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.