मुंबई : माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असणारे जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली असून लवकरच हे अभियान कार्यन्वित होणार आहे.
सन २०१४ साली विद्यमान उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे लोकार्पण केले होते. त्याला विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार या अभियानाचे काम जोरदार पद्धतीने सुरु देखील होते. सुमारे चार वर्षात या अभियानाचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले होते.
मात्र सन २०१९ साली शिवसेना युतीतून बाहेर पडली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलयुक्त शिवार अभियान बंद केले. अभियानाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यातून कोणतेही आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावण्यात आले नाहीत.
कलांतराने सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करताना शिवसेनेचे दोन तृतीयांश पेक्षा आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षासोबत युती केली. आणि ते मुख्यमंत्री झाले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवारच्या दुसरा टप्पा म्हणजे जलयुक्त शिवार अभियान २.० ला पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.