पुणे, ता. 14: पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ( Issues of Pune PMPL Employees) अनेक समस्यांचा रोज सामना करावा लागत असून त्यासंदर्भात तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने प्रशासनाकडे केली आहे.
या पत्रात कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्ट्या, किरकोळ कारणावरून निलंबन अशा समस्यांपासून महिला कर्मचाऱ्यांची शौचालयाअभावी होणारी कुचंबणा, पॅनलवरील दवाखान्यात कर्मचाऱ्यांना न मिळणारे उपचार अशा एकूण २६ मुद्यांचा समावेश आहे.
या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या आणि तसा तपशील संघटनेला कळवावा असे निवेदनात म्हटले असून निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांना देण्यात आले आहे. संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. मंदार जोशी, मार्गदर्शक विलास कांबळे यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन पुणे शहरचे अध्यक्ष नागेश गायकवाड, कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम, कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक तेली यांच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले आहे.
अशा आहेत त्या २६ मागण्या आणि सूचना:
१. कंत्राटी पासूनची रुजू दिनांक समावेश करणे
२. ऊर्वरित बदली हंगामी रोजंदारी सेवकांना सरसकट कायम करणे
३. बसच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहक-चालक यांचा ओटी रद्द न करणे
४. वाहतुक विभागातील पदोन्नती देणे
५. बसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी दोन आसने राखीव ठेवणे
६. मार्गावर वाहकांचे काम सुरू असतानाच अनधिकृतपणे कॅश चेक न करणे
७. आगारनिहाय रजेबाबत आगार प्रमुख यांना आदेश करणे आणि महिन्याला तीन रजा देणे
८. अचानक एक दिवस गैरहजर राहिले असता निलंबन न करणे
९. वैद्यकीय कारणास्तव लाईट ड्टुटी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना तशी ड्युटी देणे
१०. मुख्यालय सर्व आगार, हेडकॉर्टर, १-२ सेवा ज्येष्ठतेचे काम देणे
११. ॲडमिन विभागातील रिक्त जागेवर तत्काळ सेवकांच्या नियुक्त्या करणे
१२. रद्द केलेली क्लर्क भरती पुन्हा चालू करणे
१३. कंत्राटी वाहकभरती रद्द करणे
१४. मार्गावरील ई तिकीट यंत्रांची नादुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना करणे
१५. अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील हंगामी रोजंदारी सेवकांना कायम करणे
१६. पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेस खरेदी करणे
१७. वाहक-चालकांना किरकोळ कारणांसाठी निलंबित न करणे
१८. पीएमपीएमएल ॲपमधील त्रुटी दुरुस्त करणे
१९. सर्व आगारामध्ये गेट मिटिंग घेणे
२०. पॅनलवरील दवाखाने सेवकांना उपचार करण्यास नकार देत आहेत
२१. कोथरूड डेपोबाहेरील बस स्टॉप इतरत्र हलविणे
२२. बस स्थानकावर शौचालयांची सोय नसणे
२३. वाहक-चालकांना चहा भत्ता ५० रुपये करणे
२४. सेवक वर्ग अपूर्ण, त्यामुळे नवीन भरती करणे
२५. सर्व विभागाच्या सेवकांना गणवेश व इतर साहित्य उपलब्ध करून देणे
२६. वाघोली बस स्टॉपवर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र टू व्हिलर पार्किंग ठेवणे