बुलढाणा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचारांच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याला पेपर मध्ये चांगले गुण देण्याच्या नावाखाली त्याच्या आईवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका 34 वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर 10 सप्टेंबर 2024 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत अत्याचार केला. तसेच दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.आम्ही तुझ्या मुलाला चांगले मार्क देतो तू, आम्हाला खूष कर, अशी अश्लील मागणी या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईकडे केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नराधम दोन शिक्षकांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.