पुणे : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
बीज सोहळा रविवारी (16 मार्च) रोजी देहुनगरीत साजरा होणार आहे. या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली.या पुरस्कारांतर्गत एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा-सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता, असे मोरे यांनी सांगितले. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.