सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस तथा अतिवृष्टी झाली आहे. सिना कोळेगाव धरणाचे मंगळवारी ( ११ ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास २१ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते. व ३० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सिना नदी पात्रात सोडण्यात आला होता. यामुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन या नदीवरील वागेगव्हाण ( ता. परंडा ) कोल्हापूरी बंधारा ( दि. १२ ) फुटला आहे. यामुळे पिकासह शेती वाहून गेली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
सिना नदीवरील वागेगव्हाण कोल्हापुरी बंधारा सलग तिसऱ्या वर्षी हा बंधारा फुटला आहे. पावसाने तालुक्याची सरासरी ओलांडली असुन १२३ टक्के पाऊस झाला आहे. परंडा मंडळात ७०२.१० मीलीमीटर , आसू मंडळात ८४६.६० मिलीमीटर,जवळा ( नि . ) मंडळात ७१४.६० मिलीमीटर,अनाळा मंडळात ७८० मीलीमीटर नोंद झाली आहे . तालुक्याची वार्षीक ६२५ ची सरासरी ओलांडून एकुण ७२७ मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वागेगव्हाण येथील कोल्हापूरी बंधारा लगतच्या दिलीप थोरबोले,अनिल थोरबोले,कानिफनाथ थोरबोले, श्रीहरी थोरबोले,बाळासाहेब थोरबोले,तानाजी थोरबोले या शेतकऱ्यांच्या जमीनी ऊस पिकासह वाहून गेल्यामुळे त्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.
दरम्यान, गत वर्षी बंधारा दुरुस्ती साठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे.महसुल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत व पीक नुकसानीची तात्काळ पाहाणी करून व पंचनामे करून आर्थीक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे .