नागपूर : नागपूर हिंसाचाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. जमावाने आक्रमक होत दगडफेक केली, तोडफोड केली त्यामुळे यात कोट्यवधींचे नुकसान झाले. या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये जाऊन दंगल झालेल्या भागांची पाहणी केली.वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या हिंसाचारात दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार, जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, त्यांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या या हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खानला अटक केल्यानंतर आता आणखी एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरा मास्टरमाइंड सय्यद असलीम अलीचं नाव समोर आलं आहे. सय्यद असीम अली हा हिंसाचाराचा दुसरा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान घटनेतं झालेले कोट्यवधींचं नुकसान आता लवकरच दंगेखोरांच्याकडून ते वसूल केले जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, नागपूरमध्ये जी घटना झाली, त्याचा संपूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता. दंगलीत सहभागी झालेल्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहे, 12 लोकं हे 18 वर्षांच्याखालचे आहेत. त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली. यामध्ये अजूनही लोक आहेत. त्यांनाही अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगेखोरांना मदत करताना दिसतोय त्याच्यावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.