संदीप टूले / केडगाव (दौंड) : इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेकीचे पडसाद आता तालुक्यातही उमटले आहेत. त्यानुसार, सकल ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने बुधवारी (दि.13) पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज, ओबीसी समाजासह इतरही समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. यावेळी या चप्पलफेक घटनेनंतर सकल ओबीसी समाजाकडून जागोजागी रास्ता रोको आंदोलन चालू असून, चौफुला ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चप्पलफेकीची ही घटना निंदनीय असून, या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी ओबीसी बांधवांकडून देण्यात आला .
चप्पलफेक प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी ओबीसी नेते महेश भागवत, पांडुरंग मेरगळ, दौलत ठोंबरे, बाळासाहेब तोंडे पाटील, संजय इनामके, आबासाहेब चोरमले, मोहन टुले, दत्तात्रय दुबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.