बारामती, (पुणे) : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून एक वर्षांसाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हर्षद राजू काकडे उर्फ बागवान (वय – 28, रा. कोअर हाऊस, आमराई बारामती, ता. बारामती जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद राजू काकडे उर्फ बागवान यांच्यावर जबरी चोरी, भांडण तंटा, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. आरोपीला पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती.
गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा म्हणून बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी आरोपी हर्षद राजू काकडे उर्फ बागवान याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कार्यवाही होणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी इसम नामे हर्षद राजू काकडे उर्फ बागवान याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्यकलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस वाळू तस्कर व जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये धोकादायक व्यक्ती या सदरान्वये 1 वर्षाकरीता त्यांचे कार्यालयाकडील आदेश जा.क्र. पगम/एमपीडीए/एसआर/०२/०३/२०२५ ता. २९/०४/२०२५ अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे स्थानबद्धतेचे आदेशान्वये हर्षद काकडे उर्फ बागवान याचा शोध घेवून त्यास अमरावती मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे जमा करुन एक वर्षाकरीता स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस उपनिरीक्षक सतीप राऊत, पोलीस अंगलदार महेश बनकर, पोलीस अंमलदार सागर जामदार, अभिजित कांबळे, अमीर शेख, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, अक्षय सिताप, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते यांनी केली आहे.