पुणे : शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांचे निलंबित करण्याचे आदेश आवर सचिव संजय राणे यांनी आजरोजी (दि. ०९) काढले आहेत. फेब्रुवारी, मे व जून २०२२ मध्ये केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना तीन प्रकरणात दोषी ठरताना हा आदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य त्या परवानगी शिवाय राखीव असलेल्या वन विभागातील जमिन प्रदान केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच कोविड काळात देखील शासन निर्णयातील तरतुदीच्या विहित कार्यपद्धतीमध्ये काम न केल्याबाबत देखील दुसरी तक्रार करण्यात आली होती. त्याबरोबरीने होऊ घातलेल्या निवडणुकीच्या कामात देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्व तक्राराची चौकशी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तृप्ती कोलते यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हवेलीच्या निलंबित तहसीलदार तृप्ती कोलते यांना पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या निलंबन कारवाईत त्यांना केवळ निर्वाह भत्ता मिळणार असल्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच निलंबनाच्या या कारवाईत तृप्ती कोलते यांनी कोणताही व्यवसाय अथवा खाजगी नोकरी करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या निलंबन केल्याची प्रत विभागीय आयुक्त, पुणे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल व वन विभाग यांच्या कार्यासन अधिकारी यांना देखील पाठविण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.