रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर त्याकडे दुर्लक्ष केल्यास हानिकारक ठरू शकते. त्यातच आपण काहीवेळा युरिन अर्थात लघवी करावीशी वाटली तरी ती रोखून धरून बसतो. तुमची ही सवय सामान्य वाटत असली तरी लघवी रोखून धरून बसल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
लघवी वेळेवर करणे हे आपल्या शरीरासाठी अन्न किंवा पाणी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे, कारण ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. लघवी धरून बसल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. लघवी बराच काळ थांबल्यास मूत्राशयात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे संसर्ग होतो. वारंवार होणाऱ्या यूटीआयमुळे मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो. लघवी वारंवार थांबवल्याने मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. यामुळे, त्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते, ज्यामुळे नंतर मूत्राशय पूर्णपणे रिकामे होऊ शकत नाही. यामुळे लघवी करताना जळजळ आणि वेदना देखील होऊ शकतात.
लघवी धरून बसल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. दीर्घकाळ असे केल्याने किडनी स्टोन बनण्याचा धोकाही वाढू शकतो. लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशयात सूज येऊ शकते, ज्यामुळे लघवी करताना वेदना, जळजळ आणि अस्वस्थता येते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे बनते.