Film News : मुंबई : निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि काही संस्थांनी पुढाकार घेऊन विविध देशात मराठी चित्रपटाचे महोत्सव भरवले होते. या निमित्ताने महाराष्ट्रातले सर्वोत्तम चित्रपट परदेशात वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांना पाहायला मिळत होते. आता प्रकरण थोडे पुढे गेले आहे. तिथल्या चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपटाचे एकाच वेळी प्रदर्शित होणे वाढलेले आहे. दिग्पाल लांजेकर लिखित, दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट 25 ऑगस्टला महाराष्ट्रात देशाच्या अनेक भागांमध्ये शिवाय या निमित्ताने भारतासह सात देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सात देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार
ऑस्ट्रेलिया, दुबई, साउथ आफ्रिका, जर्मनी, न्यूझीलंड, कॅनडा या देशांचा या प्रदर्शनात समावेश आहे. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे, हर हर महादेव या गर्जना एकाच दिवशी होणार आहेत. महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने भरलेले आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रम सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे. (Film News)
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदी मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. (Film News)