मुंबई : ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून त्यांच्या चाहत्यांची संख्या आजतागायत वाढतच आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकलीच तर काही मिनिटांतच त्या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पडतो. पण कदाचित अनेकांना माहिती नसेल की बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांना देशसेवा करायची होती. मात्र, असं काही घडलं की त्यांचं देशसेवेचं स्वप्नच भंगले.
‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात कोलकाता येथील एका ब्रिटिश मॅनेजिंग एजन्सीचे कार्यकारी म्हणून केली आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांचा पहिला पगार होता १६४० रुपये. जे त्यांना जवळून ओळखतात त्यांना हे माहीत असेल. पण त्यांना देशसेवा करायची होती. हे खुद्द त्यांनीच सांगितलं. ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’मध्ये याबाबत त्यांनी सांगितलं.
एका स्पर्धकाने बच्चन यांना प्रश्न विचारला होता की, माझ्या एका मित्राने मला तुमच्याबद्दल सांगितले की, तुम्ही हवाई दलात भरती होण्याचा प्रयत्न केला होता, हे खरं आहे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, ‘हो, जेव्हा मी शाळेतून पास झालो होतो. मला काय करावं कळत नव्हतं. दिल्लीत माझ्या घरासमोर लष्कराचे एक मेजर जनरल राहत होते. मी त्यांना अनेकदा भेटायचो’.
…म्हणून माझी निवड झाली नाही
एके दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, ‘मला हा मुलगा हवा आहे. तो लष्करी अधिकारी होईल याची मी खात्रीने सांगतो. मला वाटलं मी ते करेन. मी प्रयत्न केला, पण त्याचा काय फायदा झाला नाही. मी भारतीय वायुसेनेच्या मुलाखतीसाठी गेलो होतो, पण तेव्हा माझ्या लांब पायांमुळे मला नाकारण्यात आले आणि वायुसेनेत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.