-संतोष पवार
पळसदेव : शिक्षकाची नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अधिकृत वेबसाइटवर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2024 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. CTET साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
CTET डिसेंबर 2024 परीक्षा 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत असेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे.
दरम्यान, अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना एका पेपरसाठी 1 हजार रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 1 हजार 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. त्याचवेळी ओबीसी, एससी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील.