नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक अशी ओळख असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) व्याजदरात बदल केला आहे. पीएनबी बँकेने अनेक प्रकारच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. म्हणजेच PNB कडून गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेणे आता स्वस्त झाले आहे. हे बदल 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. खुद्द बँकेनेच ही माहिती दिली आहे.
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% ने कपात केली होती. यानंतर रेपो रेट 6.50% वरून 6.25% झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर इतर बँकांनाही कर्जाचे व्याजदर कमी करावे लागणार आहेत. त्यानुसार, पीएनबीने व्याजदरही कमी केले आहेत. आता या बँकेकडून कर्ज घेणे स्वस्त तर होईलच, पण EMI चा बोजाही कमी होईल. काही दिवसांपूर्वीच एसबीआयनेही व्याजदर कमी केले होते. त्यानंतर आता पीएनबीने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून कमी व्याजदरात गृहकर्ज दिले जात आहे. दर वार्षिक 8.15% पासून सुरू होतो. 31 मार्च 2025 पर्यंत बहुतांश कर्जांवर प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क आकारले जाणार नाही. PNB कडून कर्जासाठी 30 वर्षांपर्यंत मुदत देते. याशिवाय ओव्हरड्राफ्टसह इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत.