Uruli Kanchan News उरुळी कांचन : उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी हद्दीचे कारण देत लोणी काळभोरच्या तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. या प्रकरणाची दुसरी बाजू रविवारी (ता. ३०) उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘शवविच्छेदन’ करण्याचे ज्ञान नसल्याने आपले अज्ञान झाकण्यासाठीच दोन्ही अधिकाऱ्यांनी ‘हद्दी’चे कारण देत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Uruli Kanchan News)
अज्ञान झाकण्यासाठी ‘हद्दी’चे कारण
उरुळी कांचन पोलीस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव उरुळी कांचन ग्रामपंचायतीने संमत केल्याने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून लोणी काळभोरच्या आकाश झेंडे या मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार… अशा आशयाची बातमी “पुणे प्राईम न्यूज”मध्ये रविवारी (ता. ३०) प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी असा ठराव झालाच नसल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, आपले अज्ञान झाकण्यासाठी उरुळी कांचनच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘हद्दी’चे कारण पुढे केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (Uruli Kanchan News)
अज्ञान झाकण्यासाठी ‘हद्दी’चे कारण
उरुळी कांचन पोलीस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव उरुळी कांचन ग्रामपंचायतीने संमत केल्याने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून लोणी काळभोरच्या आकाश झेंडे या मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार… अशा आशयाची बातमी “पुणे प्राईम न्यूज”मध्ये रविवारी (ता. ३०) प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी असा ठराव झालाच नसल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, आपले अज्ञान झाकण्यासाठी उरुळी कांचनच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘हद्दी’चे कारण पुढे केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
हद्दीचा ठराव झालाच नाही; सरपंचांचा खुलासा
डॉ. सुचिता कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी काळभोर येथील आकाश झेंडे या तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. नकार देताना डॉ. कदम यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या कथित ठरावाचा दाखला दिला होता. मात्र, हद्दीबाबत ग्रामपंचायतीने कोणताही ठराव केला नसल्याचा खुलासा सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी केल्यानंतर डॉ. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
आरोग्य विभागाचा गलथान कारभार
शवविच्छेदन करण्यासाठी एमबीबीएस पदवी घेणे गरजेचे आहे. याबरोबरच शवविच्छेदन करण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या दोन्ही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीएएमएस ही पदवी घेतलेली असून, त्यांनी शवविच्छेदन करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले नसल्याची बाब उघड झाली आहे. मागील महिन्यापर्यंत डॉ. संदीप सोनवणे हे आरोग्य केंद्रात कार्यरत होते. त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतलेली होती. त्यामुळे शवविच्छेदनाचे काम रडत-खडत का होईना, पूर्ण होत होते. मात्र, महिनाभरापूर्वी सोनवणे यांची बदली झाल्याने डॉ. कदम यांचे अज्ञान पुढे आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उरुळी कांचनसारख्या वर्दळीच्या प्राथमिक केंद्रासाठी दोन एमबीबीएस डॉक्टर देण्याची गरज आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हा धक्कादायक प्रकार घडला असून, उरुळी कांचन ग्रामपंचायत नाहक बदनाम झाली आहे.
फौजदारी दाखल करण्याची मागणी
दरम्यान, शवविच्छेदन करण्याचे वैद्यकीय ज्ञान नसल्याने, अज्ञान झाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीचे कथित ठरावाचे कारण पुढे करणे ही बाब अतिशय संतापजनक व ग्रामपंचायतीला बदनाम करणारी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीयाचे अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी केली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात उरुळी कांचन आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केल्याच्या दोन घटना पुढे आल्या आहेत. शासनाकडून महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या शासकीय नोकरांनी कामाची जबाबदारी टाळणे व जबाबदारी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीला बदनाम करणे ही बाब अतिशय दुर्देवी व चिड आणणारी आहे. वरील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन, त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणीही दांडगे यांनी यावेळी केली आहे.
लोणी काळभोर येथील आकाश झेंडे या तरुणाचे शवविच्छेदन टाळणे ही बाब चुकीचीच होती. उरुळी कांचन आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी योग्य व्यक्ती नसल्यानेच वरील प्रकार घडलेला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचातीने तसा ठराव केलेला नाही ही बाब सत्य आहे. उरुळी कांचन येथे सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीएएमएस ही पदवी घेतलेली आहे. या जागी एमबीबीएस पदवीप्राप्त अधिकारी द्यावेत, अशी मागणी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे केलेली आहे. याबाबत सोमवारी जिल्हा परिषदेत बैठक होणार असून, उरुळी कांचनसाठी चांगले वैद्यकीय अधिकारी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
-डॉ. सचिन सूर्यवंशी (प्रभारी आरोग्य अधिकारी, हवेली पंचायत समिती)