केडगाव(पुणे): काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे. याच प्रेरणेतून रविवारी (१८ मे) केडगाव ता.दौंड येथे शेकडोंच्या उपस्थितीत भव्यदिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली.

रॅलीची सुरुवात दक्षिणमुखी मारुती मंदिर चौकापासून झाली ते केडगाव ग्रामपंचायत चौकात समारोप झाला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली. या रॅलीमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, माजी सैनिक, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हातात तिरंगा आणि मुखात ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत निघालेली ही रॅली केवळ मिरवणूक नव्हे, तर भारतीय लष्कराच्या शौर्याला दिलेली सामूहिक मानवंदना होती. “भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ही रॅली कोणत्याही पक्षापुरती मर्यादित न राहता सर्व राष्ट्रप्रेमींसाठी खुली होती, हे तिचं विशेष वैशिष्ट्य. युवकांमध्ये देशप्रेम जागवणारी, राष्ट्रीय एकतेचं प्रतिक ठरलेली ही रॅली दौंड तालुक्यातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.







