Solapur News सांगोला, (सोलापूर) : पालासकट बांधलेली झोळी हवेत ४०० फुट उंच उडून झोळीत झोपलेल्या एका दोन वर्षीय मुलीचा दगडावर आदळून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील जवळा गावात ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जवळा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद, ता. सांगोला) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
साधू चव्हाण यांची सासुरवाडी जवळा आहे. त्यांची पत्नी आपल्या कन्येला दवाखान्याला घेऊन जवळा येथे आली होती. गुरुवारी दुपारी दवाखान्यात उपचार घेऊन त्यांनी मुलीला पालातील साडीच्या झोपाळ्यात झोपविले होते. कुटुंबातील सर्वांची लाडकी असलेली कस्तुरा ही दुपारी जेवण करून झोपडीत असलेल्या झोळीत झोपली होती.
बाहेर कडाक्याचे उन्ह होते. अंगाची लाहीलाही होत होती. झोपडीच्या सावलीत ही चिमुरडी झोपी गेली. दुपारी अडीच वाजता अचानक जोरदार वावटळ सुटली. या वावटळीत झोळीसह पाल उंच हवेत उडाली आणि पालासकट झोळी खाली कोसळली. कस्तुरा खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
कस्तुराला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. सदरची घटना जवळा गावातील जवळा- घेरडी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ घडलेली आहे. मरीआई गाडीवाले कुटुंबियातील ही लहानशी मुलगी आहे.
दरम्यान, याबाबत महसूल यंत्रणेनी पंचनामा केला आहे. सांगोला पोलीस ठाण्यातही याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. काही वेळातच जोरात वावटळ आली. या वावटळीने ही मुलगी चारशे फूट लांब उडून दगडावर आदळली. या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!