शिरूर, (पुणे) : वृद्ध नागरिकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लुट करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने रंगेहात पकडले आहे.
महेश हनुमंत अडागळे ( खराडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस नाईक नाथासाहेब जगताप यांनी आरोपीला शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शिरूर शहरात तहसील कार्यालयासमोरील एस. बी. आय . बँकेच्या एटीएम मध्ये वृद्ध नागरिकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून पासवर्ड माहिती करून अकाऊंट साफ करण्याच्या घटना घडत होत्या.
२९ एप्रिलला ३८ हजार रुपये चोरांनी हातचलाखीने काढून घेतली होती. त्यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांनी करण्यास सुरुवात केली.
सदर घटनेचे फुटेज संपादन करून आरोपीचा शोध सुरु असताना शनिवारी (ता. ०७) नाथासाहेब जगताप व पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर शिरूर शहरात बाजाराच्या दिवशी गस्त घालीत असताना एस. बी. आय. बॅंकेच्या समोर सदर संशयित चोर वृद्ध नागरीकांची एटीएम मध्ये जाण्याची वाट पाहत होता. फुटेजच्या आधारे सदर इसम संशयित वाटत असल्याने त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तपास शिरूर पोलीस करीत आहेत.