Pimpri News | पिंपरी, (पुणे) : फुकट पास न दिल्यास शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी एका पोलिस कर्मचार्यांनी दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.धमकी दिल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
याची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस कर्मचार्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पोलिस नाईक महेश नाळे (नेमणूक : पिंपरी पोलिस ठाणे), असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील एचए मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले.
मात्र, पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे डॉ. कोल्हे यांनी जाहीररित्या सांगितले. तसेच, धमकी देणार्या पोलिसांना कडक समज द्यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नेटकर्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला. पोलिस दलाची बदनामी होत असल्याचे लक्षात घेत पोलिस आयुक्त चौबे यांनी तडकाफडकी नाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
तसेच, पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!