Loni Kalbhor : लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर शिवशाहीच्या एस.टी. बस चालकाला कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या चारपैकी तीन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरातून अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी
उपेंद्र दुधनाथ पासवान (वय २५, रा. सध्या भिम नगर शिंदे वस्ती, हडपसर, मुळ रा. मजाक कंपनीजवळ, शिक्रापूर), भागवत रमेश अंबुरे, (वय २२, रा. सध्या भिमनगर, शिंदे वस्ती हडपसर, मूळ रा. खानापूर, ता. पातूर, जि. अकोला) आबासाहेब कैलास पऱ्हाड (वय ३३, रा. अष्टविनायक कॉलनी, पापडे वस्ती, फरसुंगी, मुळ रा. मु. पो केंदूर, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. (Loni Kalbhor ) त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, एक दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी दिली.
याप्रकरणी सुखसागर गोरखनाथ कदम (वय ३५, रा. तुळजापूर, सिडको, जि. धाराशिव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर कदम हे सोलापूर बस स्थानकात चालक म्हणून काम करतात. (Loni Kalbhor ) गुरुवारी (ता. १२) दुपारी पुण्यावरून त्यांच्याकडे असलेली शिवशाही एस.टी. बस घेऊन ते सोलापूरच्या दिशेने निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती येथील युनियन बँकेशेजारी आले असता, पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडील मोटारसायकलवरुन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी एका दुचाकीवरील दोघेजण घसरुन शिवशाही एसटी बससमोर पडले.
गाडीवरून खाली पडल्याच्या रागातून चौघांनी सुखसागर कदम यांना एस.टी. बसमध्ये घुसून शिवीगाळ करुन आम्हाला कट मारतो काय? तुझी गाडी फोडुन टाकीन? असे म्हणुन फिर्यादी यांना गाडी चालविण्यात अडथळा करून हाताने तोंडावर मारहाण करुन त्यांच्याकडील रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करुन पळून गेले होते. (Loni Kalbhor ) यावेळी घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, केतन धेंडे, अक्षय कटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी रत्यावर झालेली वाहतूक कोंडी हटवली. त्यानुसार बसचालक कदम यांनी अज्ञात चौघांविरोधात फिर्याद दिली होती.
या घटनेचा शोध लोणी काळभोर ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी घेत असताना धायगुडे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवडीपाट परिसरात थांबले आहेत.(Loni Kalbhor ) ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकासह टोलनाका परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारपूस केली असता, संबंधित गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन, एक दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गायकवाड, सायकर, देविकर, नागलोत, जाधव, कुदळे, शिरगीरे, पाटील यांनी केली आहे.