Junnar News : नारायणगाव : येथील एक अल्पवयीन मुलगी खासगी क्लासवरून पायी घरी चालत जात असताना तिला अडवून, मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील येडगाव रस्ता परिसरात घडली आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८, रा. आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा, ता. जुन्नर. जि. पुणे) याच्यावर पॉस्को (बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे १२) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथी इयत्तेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी (ता. २) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासगी क्लासमधून पायी घरी निघाली होती. दरम्यान, आरोपी नारायण बर्डे याने, तिचा पाठलाग करून, जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील येडगाव रोडवर फिर्यादीच्या घराजवळ मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ‘तुला शंभर रुपये देतो, मोटरसायकलवर बस’ असा आग्रह धरला. मुलीने गाडीवर बसण्यास नकार दिल्याने, त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पोलीस अधीक्षकांनी (पुणे ग्रामीण) या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, आरोपीला पोलीस सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा नारायणगाव पोलीस स्टेशनवर महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मुलीने घडलेली घटना आजीला सांगितली. त्यावेळी तिला रडू आवरता येत नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या पालकांनी आरोपीचा शोध घेतला असता घटनास्थळ परिसरातच आरोपी आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीने केलेल्या कृत्याचे सीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिले आहे.
याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नारायणगाव पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये मागील चार वर्षांपासून सेवेत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : राजूर येथे जागतिक हृदय रोग दिनी शंभर रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब तपासणी