पुणे – शहरातील टेकडीवर सायंकाळच्यावेळी अनेक तरुण-तरुणी बराच वेळ रोमॅन्टिक गप्पा मारण्यात दंग असतात. हे तरुण – तरुणी अशा ठिकाणी बसतात ज्या ठिकाणाहून ते कोणाला दिसणार नाहीत. मात्र, अशा जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार सध्या जोरदार घडत आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर टेकडीवर थांबूच नये, असे आवाहन वनविभाग आणि पोलिसांनी केले आहे.
वेताळ टेकडीवर सोमवारी ( ता.३) सायंकाळी एका तरुणाला धमकावून त्याच्यावर चाकूचे वार करण्यात आले. तसेच त्यानंतर त्याच्याकडील ऐवज चोरून नेले. अशा अनेक घटनांमध्ये वाढ झाल्याने वनविभाग आणि पोलीस दोघांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, तळजाई, हनुमान टेकडी, म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी, अशा अनेक टेकड्या आहेत ज्यावर सकाळ व सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत चाली आहे . दुसरीकडे सायंकाळी तरुण-तरुणी उशिरापर्यंत गप्पा मारण्यासाठी टेकडीवर थांबल्याने गुन्हेगारांचे फावत आहे. त्यांना आयते सावज मिळत असल्याने ते चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटतात. अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.