Burglary | नारायणगाव, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा २३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. पुणे – नाशिक महामार्गांशेजारी हॉटेल जरवनच्या पाठीमागे असलेल्या ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट येथे रविवारी (ता. १४) सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे.
याप्रकरणी आशिष माळवदकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गांवर जीवन हॉटेलमागे ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट आहे. यामध्ये आशिष माळवदकर यांचा तिसऱ्या मजल्यावर ३ नंबरचा प्लॅट आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता ते पत्नीसोबत घर व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील त्यांच्या कापड दुकानात गेले होते. त्यांनी घराच्या कपाटात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवली होती.
दरम्यानच्या काळात अज्ञाताने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमचे लॉक तोडत लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेले २० लाख ५ हजार रुपयांचे ३९.५ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ३ लाख रुपये असा एकूण २३ लाख ५ हजारांचा ऐवज पळविला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व फिंगरप्रिंट विभाग यांना कळवले. पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्ह्याचा तपास केला जात आहे.