Baramati News : बारामती (पुणे) : फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आरोपीला अटक
शाहबाज रौफ पठाण (वय – ३२ रा. सद्गुरु नगर, पाटस रोड ता. बारामती), असे खून झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. तर प्रवीण भानुदास मोरे (वय ३६ रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील टि सी कॉलेज रस्त्यावर शनिवारी (ता. ३०) पठान हा अंडा भुर्जी विक्री करीत होता. त्याला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करणेत आला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी (ता. ०८) त्याचा म्रुत्यु झाला होता.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
दरम्यान, यावेळी शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून पोलिसांनी प्रवीण मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.