ओमकार भोरडे
शिरुर : शिरुर यथील जैन मंदीरातील चोरी प्रकरणातील आरोपींना तपासासाठी शिरूर पोलिसांनी तळोजा कारागृहातून वर्ग करुन शिरुर येथे आणण्यात आले होते. तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा तळोजा कारागृहात दाखल करण्यासाठी नेत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी तळोजा कारागृहाजवळून पोलिसांना हिसका देऊन फरार झाला आहे. मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव, ता. शिरुर, मुळ रा. झारखंड) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, शिरुर यथील जैन मंदीरात चोरी केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले होते. दरम्यान, शिरुरसह राज्यभरातून अनेक ठिकाणाहुन चोऱ्या केल्याचे चोरट्यांनी कबुल केले होते. त्या अनुषंगाने सर्व आरोपींना तपासाकामी पोलिसांनी शिरूर येथे आणले होते.
तपासानंतर पुन्हा ५ जुन रोजी आरोपींना तळोजा कारागृहात हजर करण्यासाठी शिरुर पोलिस घेऊन निघाले होते. त्यावेळी एका आरोपीने तळोजा कारागृहाजवळ पोटात दुखत असल्याचे नाटक करून पोलिसांना झटका देत पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांचा कुचकामीपना नडला ?
सादर आरोपी घेऊन जात असताना पोलिसांनी सरकारी वाहन वापरले नाही. तसेच शस्त्र ही बरोबर बाळगली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अट्टल चोरटे असल्याचे माहीत असूनही पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले असून वरीष्ठ आता काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापुर्वीही पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शिरुर येथील सबजेल मधुन एक आरोपी पळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा शिरुर पोलिसांच्या ताब्यातील आरोपी तळोजा कारागृहाजवळून पळुन गेला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.