पुणे : येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवरील लँडमार्क सोसायटीजवळ एका ग्रे रंगाच्या पोर्श कारने मोटारसायकलवरुन जात असलेल्या एका तरूणासह तरुणीला धडक दिली. यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातावेळी कारणीभूत ठरलेल्या मुलाचे वडिल विशाल अग्रवाल आणि त्याला दारु देणा-या पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्य पुरवल्याप्रकरणी मॅरियट सुट्समधील ब्लॅक आणि मुंढवा येथील कोझीज या पबच्या चालक मालकांना पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याप्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या अपघाताचा तपास खडकी सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत. तर, दुसऱ्या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
यावेळी हॉटेल कोझीजचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर तसेच ब्लॅकचे व्यवस्थापक संदीप सांगळे, जयेश बोनकर यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक विशाल अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3, 5, 199 अ, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 चे कलम 75, 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ महादेव तोडकरी यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघाताप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भादवि कलम 304,304 (अ), 337, 338, 427, 279 सह मोटर वाहन कायदा कलम 184, 119/177 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
या प्रकरणाचा तपास खडकी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे या करीत आहेत. तर, विशाल अग्रवाल, भुतडा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. कोझी हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर यांनी, तसेच ब्लॅक हॉटेलचे मॅनेजर संदिप रमेश सांगळे व बार काऊंटर जयेश सतीश बोनकर यांना गुन्हे शाखेने अटक करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.