कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. ७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. धुणं धुण्यासाठी कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उदय बचाराम कटाळे (वय -५४), अरुण बचाराम कटाळे (वय ५६), प्रकाश अरुण कटाळे (वय-१३) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. कटाळे कुटुंबातील उदय कटाळे, अरुण कटाळे हे बंधू घरातील धुणे धुण्यास या बंधाऱ्यामध्ये उतरले. या दरम्यान अरुण यांचा मुलगा प्रकाश हा बंधाऱ्यामध्ये धुणे धुत असताना बुडाला. हे पाहताच त्याला वाचविण्यासाठी अरुण यांनी बंधाऱ्यात उडी मारली. तर त्या पाठोपाठ उदय यांनीही उडी मारली.
याबरोबरच आणखी एकानेही उडी मारली. मात्र उदय, अरुण आणि प्रकाश या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.