पुणे : अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचे स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले आहे. असे अनेक लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा आहे. मात्र, लंके यांच्याबाबतीत यात काहीही तथ्य नाही, असे म्हणत पवार यांनी सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चर्चा एका वाक्यात फेटाळून लावली.
निलेश लंके पुन्हा तुमच्या बाजूला येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत काय सांगाल? त्यांचा पक्ष प्रवेश आज होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंकेंबाबत मला ठाऊक नाही. ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली आहे. असे अनेक लोक आहेत. त्यांना सगळ्यांना विचारत बसणार का?, असं शरद पवार म्हणाले.
खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेंना परतीची साद घातली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे गणित लक्षात घेऊन आमदार नीलेश लंके आज घरवापसी करणार असल्याचं बोललं जात होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून लंके पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर परतीच्या मार्गाने आलेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते.
दरम्यान, आज सकाळी अचानक लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा वेगाने सुरू झाली. पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद बोलाविली होती. त्यावेळी लंके यांचा पक्षप्रवेश आणि घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत होत होते. शिवाय लंके रात्रीच पारनेरमधून बाहेर गेलेले आहेत. पारनेरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती. तरीही सूत्रांच्या हवाल्याने लंकेच्या घरवापीसीच्या बातम्या पसरत होत्या.
यासंबंधी पत्रकारांनी पत्रकार परिषदेतच खुद्द पवार यांना यासंबंधी विचारले. त्यावर पवार म्हणाले की या चर्चेत काहीही तथ्य नाही. लंके संपर्कात आहेत, ते आले तर त्यांना पुन्हा प्रवेश देणार का? या प्रश्नांनाही पवार यांनी थेट उत्तरे दिली नाहीत. जे सोडून गेले आहेत, त्यांनाही हे काही बरे चालले नाही, हे कळत आहे. त्यामुळे अनेकांची अशा अनेकांच्या चर्चा आहेत, अनेक इच्छूक आहेत. यासंबंधी माहिती तपासून, योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले. त्यामुळे लंके यांच्या घरवापसीच्या चर्चेवर तूर्त तरी पडदा पडला आहे.