पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्याला जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ईशांत राजेंद्र दारोळे असं हल्ला झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.मुलगा रस्त्यावर शांतपणे खेळत असतानाच दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ईशांतला अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

दरम्यान गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या परिसरात दोन कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून आत्तापर्यंत १७ पेक्षा अधिक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.







