पुणे : त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या ‘गोरी ब्युटी क्रीम’ मध्ये मानवी आरोग्याला घातक असणारे विषारी घटक आढळले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा तपासणीत हे सिद्ध झाले असून, या क्रीमच्या खरेदी, विक्री आणि वापरावर प्रशासनाने आता तातडीने बंदी घातली आहे.

या फेअरनेस क्रीममध्ये ‘पारा’ आणि ‘शिसे’ हे जड धातू सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विषारी घटकांमुळे ग्राहकांना त्वचेचे गंभीर आजार, ॲलर्जी आणि काळे डाग पडण्याचा मोठा धोका असतो. इतकेच नव्हे, तर या क्रीमच्या दीर्घकालीन वापरामुळे थेट त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो.

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन सध्या कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आहे. या पथकाने एप्रिल महिन्यात नागपूरजवळील कामठी आणि इतवारी भागात मोठी धाड टाकून या क्रीमचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर 10 मे रोजी हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. नुकत्याच मिळालेल्या अधिकृत अहवालानंतर या क्रीममधील जीवघेणा काळाबाजार उघडकीस आला आहे.
हा धोकादायक अहवाल समोर येताच एफडीएने बाजारातून हा सर्व साठा तातडीने मागे घेण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत. गोरेपणाच्या खोट्या जाहिरातींना आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, नागरिकांनी या क्रीमचा वापर ताबडतोब थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. खाद्यपदार्थांच्या भेसळीनंतर आता सौंदर्य प्रसाधनांमधील या मोठ्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.







