पुणे : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटात एक भयानक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या मार्गावरून जाणारी मारुती सुझुकी इको गाडी अचानक सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 6 प्रवाशांना घेऊन ही इको गाडी पोखरी घाटातील वळणावरून जात होती. रस्त्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की,गाडीतील चालकासह एका महिलेने जागीच प्राण गमावले, तर उर्वरित 4 पुरुष प्रवासी अपघातात जखमी झाले.
घटना घडल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी घाटाकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांना व रुग्णवाहिकेला याविषयी माहिती दिली. गावकऱ्यांनी दरीत उतरून मोठ्या प्रयत्नाने जखमींना बाहेर काढले. अपघातग्रस्त प्रवाशांवर आधी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







