उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत जमिनीतील लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींग करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारी ठेकेदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 04) रंगेहात पकडले.
धम्मपाल हीसाजी पंडीत, (वय 50, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका सरकारी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक सरकारी विद्युत ठेकेदार आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील खाजगी जमीन मालक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या जमिनीतील लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींग करण्याचे काम दिले होते. सदर कामाची फाईल मंजुरीकरीता लोकसेवक धम्मपाल पंडीत यांचेकडे प्रलंबित होती. नमुद फाईल मंजुर करण्यासाठी लोकसेवक धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपयांची मागणी केली होती. लाच मागणी केल्याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना तक्रार दिली होती.
दरम्यान, या प्रकाराची खात्री करण्यासाठी सोमवारी (ता.4) धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
यापूर्वीही लाचेची झाली होती मागणी
याच कार्यालयातील तत्कालीन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप वासुदेव सुरवसे यालाही खाजगी विद्युत ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर धम्मपाल हिसाजी पंडित यालाही ताब्यात घेतल्याने उरुळी कांचन येथील महावितरणचे कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे.