उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात 10 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झालेला अविश्वास ठराव सर्वोच्च न्यायालयाने देखील वैध ठरविला आहे. सरपंचपदाची खुर्ची टिकविण्यासाठी व मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत रंगलेला हा संघर्ष आता संपुष्टात आला आहे.
कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे सरपंच शितोळे यांच्या विरोधात 21 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला ठराव 10 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाला होता. या ठरावाविरुध्द सरपंच शितोळे यांनी तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जातपडताळणी दाखल केली नाही म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करुन झालेला ठराव हा अवैध असल्याच्या मुद्दावर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता.
1 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत उच्च न्यायालयाने विठ्ठल शितोळे यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शितोळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शेवटचा पर्यायही अवलंबून पाहिला. यावर सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबरला सुनावणी घेऊन हे प्रकरण तात्काळ निकाली काढत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे आता कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या ‘संगीत’ खुर्चीचा अखेर निकाल लागला आहे.
दहा सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल
कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या १३ पैकी १० सदस्यांनी सरपंच शितोळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामध्ये बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने कामकाज करणे, अशा तक्रारी या दहा सदस्यांनी नमूद केल्या होत्या.