मुंबई: बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत काही वक्तव्ये माझ्या आणि छगन भुजबळ यांच्याकडून आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विसंगत वक्तव्ये करु नये, असे सांगितले. एकाच सरकारमध्ये कोणतीही विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेवढचं बोला. एकदम खेळीमेळीत चर्चा झाली, मी आता जे काही बोललो तेवढेच घडल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सध्या मंत्रिमंडळात गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. शिवाय कॅबिनेट बैठकीत एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले आहे. यावरून हसन मुश्रीफांनी संजय राऊतांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले असताना मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) देखील आता समोर आले आहेत.
संजय राऊतांचे खबरे त्यांना एक दिवस अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो आहे, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. जर राऊत हे आरोप सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असे मुश्रीफ बोलले, मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. संजय राऊतांना काम करणे नीट जमते, त्यांना तेच काम दिलेले आहे. जे मुळात घडले नाही ते भासवले जातेय. राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.