Pune News : पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाची राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील गणेशभक्तांना भुरळ पडते. महापालिकेने देखील उत्सवाच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, विसर्जन घाटांवरील कर्मचारी व्यवस्थापन, औषधोपचार व्यवस्था, कीटकनाशक फवारणी, जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणेची कामे आता पूर्ण झाली आहेत. उत्सव काळात जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांची गळती रोखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान महापालिकेचे अंतर्गत दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधोपचार दिले जाणार आहेत.
१०८ रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध
उत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच फिरती स्वच्छतागृहेही उपलब्ध करून दिली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व १५ क्षेत्रीय कार्यालये, अग्निशमन दल, विद्युत विभाग आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कामकाजाचे नियोजन केले आहे. (Pune News) क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर मिरवणूक मार्गावर स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. औषधोपचारांची व्यवस्थाही करण्यात आली असून, कंटेनर, निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विसर्जन घाटांवर औषध फवारणी करण्यात आली असून, नदी किनारच्या घाटांवर विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सुविधा दिली आहेत. विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा ठिकठिकाणी बसवली आहे.
विसर्जन हौदांची दुरुस्ती व रंगकाम पूर्ण झाले आहे. विसर्जन घाटांवर अग्निशमन दल आणि जीवरक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मुकादम, विद्युत विभागातील कर्मचारी यांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. गणेश मूर्ती संकलन आणि दान केंद्रांची व्यवस्थाही क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आली आहे. (Pune News) नदी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी धोका नियंत्रक कठडे उभारले आहेत. आरोग्य विभागाकडून चार फिरत्या दवाखान्यांची सुविधा देण्यात आली असून ही सेवा विसर्जन मार्गावर राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये फिरत्या दवाखान्यांबरोबरच १०८ रुग्णवाहिकेची सुविधाही आहे. गणेशोत्सवाच्या कालावाधीत सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधोपचार आरोग्य विभागाकडून दिले जाणार आहेत.
शहरातील १८ विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाकडून जवानांची नियुक्ती केली असून, १३० खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.(Pune News) नदी किनारी सुरक्षेच्या दृष्टीने दोरखंड लावण्यात आले आहेत. अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
०२०-२५५-१२६९
०२०-२५५०६८०० (१/२/३/४)
गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ९६८९९३१५११
देवेंद्र पोटफोडे अग्निशमन प्रमुख- ८१०८०७७७७९, ०२०-२६४५१७०७
अग्निशमन दल- १०१
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पीएमपी बस प्रवासात तरुणीची छेडछाड; रोडरोमिओला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा