Jalna News : जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिवाची हत्या झाली आहे. संतोष आढाव असे हत्या झालेल्या वंचितच्या महसचिवाचे नाव आहे. जालना येथील रामनगर साखर कारखाना परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. जमिनीच्या वादातूनच त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, जालना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संतोष आढाव यांना वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.(Jalna News)
जमिनीच्या वादातूनच त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष आढाव यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्यांची निघृण हत्या करण्यात आली. रामनगर साखर कारखाना परिसरातील गायरान जमीन परिसरात ही घटना घडली. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष आढाव यांचा जागीच मृत्यू झाला.(Jalna News) या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष आढाव यांच्या हत्येप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी निवृत्ती आढाव याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपी फरारी असून, त्यांचा शोध सुरु आहे.(Jalna News)
दरम्यान, जमिनीच्या वादातून ही हत्या त्यांच्या चुलत्यानेच केल्याची माहिती समोर येत आहे. आढाव कुटुंबियांना शासनाकडून रामनगर साखर कारखाना याठिकाणी गायरान जमीन मिळाली होती. या जमिनीवरून संतोष आढाव आणि त्यांच्या चुलत्यामध्ये वाद होत होते. याच जमिनीबाबत चर्चेसाठी चुलत्याने आढाव यांना बोलावले होते. चर्चेदरम्यान वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातूनच संतोष आढाव यांची निघृण हत्या करण्यात आली.(Jalna News)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतोष आढाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जालन्यात या प्रकाराने खळबळ उडाली आहे.