राहुलकुमार अवचट
Yavat यवत : विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाबरोबर अन्य विषयाची माहिती असावी या उद्देशाने विविध उपक्रम अनेक शाळेत राबविले जातात. परंतु चौफुला (ता. दौंड) येथील शिवा व्हॅली स्कूल यांच्या वतीने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
पत्रकारांचे झाडे भेट देऊन स्वागत…!
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या किरण सिंग यांनी उपस्थित पत्रकारांचे झाडे भेट देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी वैभवी ननवरे, रिती सुंदराणी, आर्या कुतवळ , स्नेहा टुले , समीक्षा बोत्रे, सिद्धी म्हेत्रे, आदींनी पत्रकारांची हितगुज करताना विविध प्रश्न विचारले. मुलांच्या प्रश्नांना एम.जी.शेलार, रमेश वत्रे, विजय चव्हाण, सुमित सोनवणे, यांनी उत्तरे दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश वत्रे यांनी अगदी सोप्या भाषेत पत्रकारिता व वर्तमानपत्राचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला बातमी मिळवण्यापासून ते छापून येईपर्यंत तर पेपरच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
तर विजय चव्हाण यांनी जुनी पत्रकारिता व सध्याची पत्रकारिता, पत्रकारिता करताना येणारे चांगले वाईट अनुभव याबाबत माहिती दिली. पत्रकार विठ्ठल होले यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सध्या मोबाईलचा कमी वापर करावा असा सल्ला दिला. तसेच राजेंद्र सोनवलकर, सुमित सोनवणे योगिता रसाळ, बापू नवले यांनीही पत्रकारिते बाबत माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार म्हणाले, मुले लहान असो व मोठी त्यांना पत्रकारांशी हितगुज साधायचे आहे ही फारच चांगली गोष्ट असून विद्यार्थी वर्गासाठी कार्यक्रम असला तरी येथे तुम्ही अनेक नवे जुने जेष्ठ पत्रकार एकत्र बोलवून विद्यार्थ्याशी बोलण्याची संधी दिली. याबद्दल प्राचार्य किरण सिंग व सर्व शिक्षकांचे शेलार यांनी अभिनंदन केले.
तसेच तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे शाळेमध्ये पत्रकारांना बोलून त्यांचा आदर सत्कार संवाद साधला जात असल्याने पत्रकारांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व शिवा व्हॅली स्कूलचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनी देखील घ्यावा. अशी भावना शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी व्ही. शिपळकर, आनंदा बारवकर, गौरव दिवेकर, नवनाथ खोपडे, राहुलकुमार अवचट आदि पत्रकार व शाळेचे शिक्षक सलोमन पिले, शरद दरेकर, राजेश्री जगताप, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण होले यांनी तर आभार पांडुरंग फडके यांनी मानले.