मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना रद्द करण्यासाठीची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विनाकारण या प्रकरणात दिरंगाई करत आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. तर मुंगी मारण्यासाठी आपण हातोडा वापरू शकत नाही, असे विधानही न्यायालयाने केले आहे. एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचे नाही, म्हणून परवानाच रद्द करणे हे कठोर पाऊल असेल, असेही कोर्टाने सांगितले आहे.
दरम्यान, तपासणी केलेल्या संचातील सर्व माल कंपनीने नष्ट करावा आणि आक्षेप घेण्यात आलेल्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. जॉन्सन जॉन्सन कंपनीने सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे बेबी पावडर विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.