पुणे – सिंहगडावर ३१ डिसेंबर रोजी वर्षअखेरीस सकाळपासून पर्यटकांची तोबा गर्दी होती. वाहतुकीचे नियोजन केल्याने सिंहगड घाट रस्त्यावर काही ठिकाणे वगळता वाहतूक सुरळीत सुरू होती. दिवसभरात राज्यासह देशभरातील वीस ते तीस हजारांवर पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. गडावरील वाहनतळ दुचाकी, चारचाकी वाहनांनी भरलेले होते.
३१ डिसेंबर रोजी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सिंहगड किल्ला सायंकाळी सहा वाजताच वनविभागाने मोकळा केला. गडावर जाणार्या दोन्ही बाजूंच्या घाट रस्त्यासह अतकरवाडी पायी मार्गावर गडावर जाणार्या पर्यटकांना रोखण्यासाठी रात्रभर जागता पहारा ठेवला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्या बेकायदा पार्ट्या, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवली होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली सकाळपासून वनविभागाने वाहतुकीचे नियोजन केले. परिणामी, वाहनांची गर्दी होऊनही वाहतूक कोंडी झाली नाही. दुपारी चारनंतर गडावर पर्यटकांची वाहने सोडणे बंद केले. साडेपाच वाजल्यापासून गडावरील पर्यटकांना खाली जाण्यास सांगण्यात आले.
सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके व वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह सुरक्षा रक्षकांसह गडावर तळ ठोकून होते. सायंकाळी सहा वाजता गडावरील पर्यटक खाली गेल्याने इतिहासात प्रथमच ३१ डिसेंबर रोजी गड सायंकाळी मोकळा झाला.
दुपारपासून खडकवासला धरण माथ्यावर सिंहगड पानशेतकडे जाणार्या पर्यटकांची, वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मद्यपी पर्यटकांवर प्रतिबंधात्मक, बेकायदा मद्य बाळगणार्यांनावर कारवाईचे प्रशासनाने पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
त्यासाठी हवेली व वेल्हे पोलिसांनी मुख्य रस्ते, तसेच धरण परिसरात उद्या २ जानेवारी सकाळपर्यंत बंदोबस्त सज्ज केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.