लोणी काळभोर : नातेवाईकाच्या विवाहासाठी आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.17) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दिगंबर नागनाथ कासार (वय -38, रा. मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कासार यांचे बार्शी येथे मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. कासार हे त्यांच्या नातेवाईकांच्या विवाहासाठी कुंजीरवाडी येथे चारचाकी गाडीने आले होते. येथे आल्यानंतर रविवारी सकाळपासूनच त्यांच्या पोटात दुखत होते. तसेच त्यांना मळमळ व चक्कर येत होती.
दरम्यान, विवाह सोहळा दुपारी पार पडल्यानंतर कासार यांना खूप त्रास होऊ लागला. त्यांना कुंजीरवाडी येथील साई सेवा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अचानक उलटी होऊन ते बेशुद्ध झाले.
त्यानंतर कासार यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितली. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्यची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार योगेश कुंभार घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी कासार यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कासार यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.