पुणे प्राईम न्यूज : मराठी कलाविश्वातील अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाते. अशातच त्यांच्याबाबतीत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ‘सुमन इंदोरी’ मालिकेच्या सेटवर शुटिंग दरम्यान अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, निशिगंधा वाड यांचा ‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या सेटवर शुटिंगदरम्यान त्या घसरल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्या पुन्हा शुटिंगला सुरुवात करतील.
या घटनेनंतर सुमन इंदोरी मालिकेच्या निर्मात्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून मालिकेचं चित्रीकरण काही काळ थांबवलं आहे. निशिगंधा वाड यांच्या अपघाताची बातमी चाहत्यांना समजल्यावर अनेकांना धक्का बसला. त्या लवकरात लवकर ब-या व्हाव्यात म्हणून अनेकांनी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, ‘सुमन इंदोरी’ या मालिकेत निशिगंधा वाड या सुमित्रा मित्तल हे पात्र साकारत आहेत. या मालिकेत निशिगंधा या शांत, प्रेमळ सासूची भुमिका साकारत आहेत. सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.